Sahityik Masti Club Reports Nov-Dec 2014

साहित्यिक मस्ती
तारीख :- ८/११/२०१४
वेळ :- ९.३० ते १.००
ठिकाण :- राजा केळकर संग्रहालय
सर्व विद्यार्थी राजा केळकर संग्रहालय येथे सकाळी ९.३० वाजता जमले. या वेळी आमच्याबरोबर काही पालक देखील उत्साहाने सहभागी झाले होते. सर्वांची तिकिटे काढून आम्ही आत प्रवेश केला. मुख्य प्रवेशद्वारापासून विद्यार्थ्यांची उत्सुकता वाढत गेली. सौ. पवार यांनी सर्व वस्तुंची अत्यंत सुरेख व रंजक माहिती सांगितली.
प्रथम केळकर यांच्याबद्दल माहिती सांगितली. संग्रहालय एकूण दोन विंग्स मध्ये विभागले आहे. पहिल्या विंग मधील विविध मूर्ती, दिव्यांचे विविध प्रकार, भांड्यांचे अनेक प्रकार व आकार पाहून सर्वांना आश्चर्य वाटू लागले की केळकरांनी या वस्तू कशा जमवल्या असतील. पूर्वीच्या काळी वापरले जाणारे दागिने, साड्या, अंगरखे, कुंकवाचे करंडे, इ. पाहून पूर्वीच्या पेहेरावाची कल्पना आली. नंतर भांड्यांच्या विभागातील विविध आकाराची व प्रकारची भांडी बघून गावजेवणाच्या वेळी केवढा स्वयंपाक होत असेल याचा अंदाज आला. कधीही न पाहिलेल्या विळ्या, अडकित्ते, घुसळखांब इ. येथे बघायला मिळाल्या. एका दालनात लढाईच्या वेळी वापरली जाणारी विविध आयुधे, चिलखते, बंदुकीचे विविध प्रकार, चिलखते, अंबारी इ. बघितले.
दुसऱ्या विंग मध्ये प्रथम विविध प्रकारचे दिवे बघायला मिळाले. त्यामधील शिवाजी महाराजांच्या काळातला अन्नाची विषपरीक्षा करणारा दिवा बघून सर्वांनाच आश्चर्य वाटले. त्यापुढील दालनात विविध वाद्ये बघायला मिळाली. त्यानंतर मस्तानी महाल दाखविण्यात आला. त्याचे वैशिष्ट्य हे आहे की कोथरूड मध्ये जो खरा मस्तानी महाल होता त्याचे खांब व अवशेष आणून त्याची येथे प्रतिकृती तयार करण्यात आली आहे. त्यानंतर संग्रहालयातील शेवटच्या भागात आम्ही आलो तो होता विविध प्रकारचे नक्षीकाम व कलाकुसर केलेले हस्तिदंती व लाकडी दरवाजे व खिडक्या व झरोके. ते पाहून डोळ्यांचे पारणे फिटले.
हे सर्व बघण्यात तीन तास कसे गेले ते कळलेच नाही. सर्वांनाच असे वाट होते की पुन्हा एकदा जाऊन ते सर्व पाहावे. सौ. पाटील यांचे आभार मानून आम्ही तेथून निघालो.
तारीख :- १3/ 12/ २०१४
वेळ :- सकाळी १०.३० ते १.३०
ठिकाण :- ई – स्क्वेअर चित्रपटगृह
विषय :- ‘एलिझाबेथ एकादशी’ चित्रपट पाहून त्याचे परीक्षण लिहिणे.
सर्व विद्यार्थ्यांना चित्रपटगृहावर सकाळी १०.३० वाजता बोलावले होते. सर्वांची तिकिटे काढून झाल्यावर त्यांना चित्रपटाचे परीक्षण लिहायचे असल्यामुळे चित्रपट बारकाईने बघावा असे सांगितले.
चित्रपट मनोरंजनात्मक तर होताच परंतु त्याचबरोबर मुल्यशिक्षण देणाराही होता. वडील नसलेली दोन मुले आपल्या आईला अडचणीच्या वेळी कशी मदत करतात, त्यांना त्यांचे मित्र कशी साथ देतात व आईला न सांगता काही गोष्टी केल्यामुळे ती कशी अडचणीत येतात याचे चित्रीकरण या सिनेमा मध्ये आहे. मुलांची आईला मदत करण्यासाठीची प्रामाणिक धडपड यात दाखवली आहे.
क्लबच्या विद्यार्थ्यांना यातून हे मूल्यशिक्षण मिळाले की गरिबीत माणसाला किती अडचणी येऊ शकतात व तरीही त्यातून प्रामाणिकपणे पैसा मिळवून मार्ग काढता येऊ शकतो व खऱ्याचा नेहमी विजय होतो.
चित्रपट संपल्यावर विद्यार्थ्यांना त्याचे परीक्षण कसे लिहावे याचे मार्गदर्शन करण्यात आले व परीक्षण लिहून देण्याची तारीख सांगण्यात आली.
16 views0 comments